संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखडा प्रलंबित विकासकामे गतीने पूर्ण करा – डॉ. निधी पाण्डेय

0
38

विविध विकासकामांची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, दि. 5 :  संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यांतर्गत असलेल्या भक्त संकुल, ध्यान केंद्र व स्मशान भूमी आदी विविध विकासकामांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज केली. यानुषंगाने आराखड्यातील विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासह ती गतीने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सोनवाल, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, तहसीलदार विजय लोखंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्रात किर्तन, भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या दृष्टीने त्यांनी जनजागृती करुन स्वच्छतेचा संदेश सर्वदूर जनमाणसांत पोहाचविला. अशा या कर्मयोगी संताचे विचार व स्मृती लोकांना प्रेरणादायी ठरावे, यासाठी वलगाव या संत गाडगेबाबांच्या निर्वाणभूमी लगतच्या 10 एकर जमीनीवर स्मृती केंद्र उभारण्यासाठी शासनाने 37 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर केला आहे. यातून स्मृती केंद्राच्या ठिकाणी संत गाडगेबाबांचा कांस्य पुतळा बसविणे, प्रतिक्षालय इमारत, भक्त संकुल, ध्यान केंद्र, उद्यान, सभामंडप, समाधीस्थळाचे सौंदर्यीकरण व परिसराचा विकास, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, बसस्थानकाचे बांधकाम आणि सौंदर्यीकरण, पेढी नदीवरील घाटाचे बांधकाम व दुरुस्ती आदी विकासकामांचा समावेश आहे.

आराखड्यातील प्रलंबित विकासकामे गतीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच निर्माण झालेल्या इमारत, उद्यान, संकुल व ध्यानकेंद्र आदींच्या रखरखाव व स्वच्छतेच्या दृष्टीने ती हस्तांतरीत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. याठिकाणी नियमितपणे काळजीवाहक उपस्थित राहणार यादृष्टीने संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. प्रलंबित बांधकामे व सौंदर्यीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here