पावसामुळे संत्रा गळती नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
58

अमरावती, दि. १ : वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. वरुड तालुक्यातील नवासा पार्डी येथील ज्ञानेश्वर मोघे यांच्या शेतातील संत्रा पिकाच्या नुकसानीची पाहणी श्री. पवार यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार देवेंद्र भुयार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते उपस्थित होते.

वरुड परिसरात गेल्या कालावधीमध्ये पावसामुळे संत्रा पिकाचे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे संत्रा बहाराचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या नुकसानीची तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळावी, यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशा सूचना दूरध्वनीद्वारे  जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना दिल्या. पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाले असले तरी शेतकऱ्यांचे जादा होत असलेले नुकसान पाहता दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करून तातडीने मंत्रालयस्तरावर सादर करण्यात यावे. शेतकऱ्यांना मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

यावेळी श्री. पवार यांनी संत्रा पिकाबाबत माहिती घेतली. संत्रा पिकासाठी येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पादन याबाबत माहिती जाणून संत्र्याच्या असणाऱ्या जाती, चवीने उत्कृष्ट असणारे फळाची जाती, याबाबत माहिती घेतली. तसेच शेतकऱ्यांनी जनावरांसाठी हिरवा चारा उत्पादन घेण्यासाठी ही पुढे येण्याचे आवाहन केले.

0000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here