बीड जिल्हा संपन्न, समृद्ध आणि औद्योगिकदृष्ट्या अव्वल घडवू या- मंत्री धनंजय मुंडे

0
68

भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

 बीड, दि. १५ (जिमाका):  आगामी काळात पायाभूत सुविधांनी समृद्ध कृषिसंपन्न आणि औद्योगिकदृष्ट्या राज्यात अव्वल असा बीड जिल्हा घडवू या, असे आवाहन कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केले

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

 

यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ तसेच जिल्हा परिषद प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता डी. पाटील यांच्यासह सर्व कार्यालयप्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, लोकाभिमुख योजनांची आखणी आणि अंमलबजावणी राज्यात सुरू आहे. राज्यातील प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी महिला तसेच युवकांपर्यंत विकासाचा लाभ पोहोचत आहे. राज्यातील 2 कोटीहुन अधिक बहिणींना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली असून पहिल्या 2 महिन्यांचे प्रत्येकी 3 हजार रुपये अर्थसहाय्य थेट या बहिणींच्या खात्यात राखीपौर्णिमेपर्यंत मिळणार आहेत. बीड जिल्ह्यात 3 लाख 45 हजार भगिनी आतापर्यंत पात्र ठरलेल्या आहेत. केंद्र सरकारची उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींना प्रतिवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ देखील राज्य सरकारने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले

दि. 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेला प्रत्येक मुलीच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’  राज्य शासन राबवित आहे. या अंतर्गत आपल्या जिल्ह्यात 873 लाभार्थीना 43 लाख 75 हजार रुपये इतका लाभ शासनाने दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या वर्षी खरीप हंगामापासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली. बीड जिल्ह्यात 2023-2024 च्या खरीप व रब्बी हंगामात मिळून 400 कोटी 24 लाख रुपये पीकविमा मंजूर करण्यात आला असून यापैकी आतापर्यंत सुमारे 379 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात आले असून, उर्वरित 21 कोटी रुपये वितरित करणे सुरू आहे. याशिवाय विमा कंपनीने कोणतेही कारण न देता नाकारलेले विमा प्रस्ताव मंजूर करून त्याही शेतकऱ्यांना येत्या काही दिवसात पीकविमा मिळणार आहे. चालू हंगामात खरीप पिकासाठी 17 लाख 14 हजार विमा अर्ज सादर करून लाखो शेतकऱ्यांनी याही वर्षी एक रुपयात पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. वेळोवेळी होणारी अतिवृष्टी, वादळ वारा, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तींच्या भरपाईपोटी गेल्या 2 वर्षात 7 लाख 21 हजार 607 शेतक-यांना 593 कोटींहून अधिक रकमेची भरपाई थेट त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

शेतकरी वर्गाचे उत्पन्न वाढावे यासाठी थेट लाभाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसोबतच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 3 लाख 89 हजार शेतकऱ्यांना 108 कोटी 14 लाख रुपयांचा लाभ शासनाने दिला असून थेट लाभाचाच एक भाग म्हणून शेतीतील वीज बिलात सवलत म्हणून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सरकारने जाहीर केली आहे. या योजनेमुळे 7.5 (साडेसात) एचपीपर्यंतच्या कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करण्यास निश्चितच मदत होणार आहे. 2029 पर्यंत ही योजना राबवली जाणार असल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

यंदा चांगल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना उत्पादन वाढीची संधी आहे याच भूमिकेतून जिल्ह्यात या खरीप हंगामात 3 पट अधिक खताची उपलब्धता करून देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री श्री. मुंडे म्हणाले की, दिवसेंदिवस यांत्रिकीकरण वाढत आहे यांचा लाभ शेतक-यांना मिळावा यासाठी जिल्ह्यातील 398 शेतकऱ्यांना 2 कोटींहून अधिक रकमेच्या कृषी यांत्रिकी साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

सेंद्रीय शेतीचेही महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या परंपरागत कृषी विभाग कार्यक्रमात आपला जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून सध्या एक हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणण्याचे काम सुरु आहे. तसेच राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत येत्या 3 वर्षात 21 हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणले जाणार आहे.

कृषी व पशू प्रर्दशन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी संदर्भातील नवे तंत्रज्ञान आणि यंत्र सामुग्री, नवनवीन शोध, शेतीतील आधुनिक व शास्त्रोक्त माहिती मिळावी तसेच नवनवीन उपकरणे, इत्यादी खरेदी करणे शक्य व्हावे सोबतच पशु पालनातील नवे तंत्र व उपलब्धता यासाठी येत्या 21 ऑगस्टपासून परळी येथे भव्य राज्यस्तरीय 5 दिवसीय कृषी व पशुपालन प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी व शेतीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीने घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सध्या राज्यात महसूल पंधरवडा सुरू आहे. यानिमित्ताने महसूल विभागाच्या माध्यमातून आपले काम चोखपणे पार पाडणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.  महसूल विभागाकडून करण्यात येणारी ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे. यात ग्रामीण भागातील सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री श्री. मुंडे यांनी केले.

नुकतेच कृषी विभागाने मागील वर्षी सोयाबीन व कापसाचे भाव पडल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5 हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी कृषी विभागाने निधी उपलब्ध करून दिला असून, ई-पीक पेऱ्याची नोंद असणारे सर्व सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी यासाठी पात्र आहेत. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी बांधवांनी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यकांकडे संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत देणे गरजेचे आहे. कृषी सहाय्यक बांधवांना देखील उद्यापासून या कामासाठी आपापल्या गावांमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील महसूल यंत्रणा मजबूत व्हावी, यासाठी तलाठी भरती 2023 अंतर्गत 193 पदांची भरती करण्यात येत आहे यातील 140 जणांना आतापर्यंत नियुक्ती देण्यात आली आहे. यामुळे जनतेची कामे गतिमान पद्धतीने होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्यांचे शिक्षण झाले आहे आणि आता हातात काम नाही अशा युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कामाचे प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यातून रोजगार संधीसह कुशल युवाशक्ती आणि जिल्ह्यात रोजगार वाढणार आहे असे सांगून त्यांनी जिल्ह्यात गतिमान पद्धतीने विकास व्हावा, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. यंदाचा जिल्ह्याचा आराखडा 484 कोटी रुपयांचा आहे. यातील सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे राहणार असल्याची माहिती यावेळी दिली.

जिल्ह्यात पत्र्याच्या शेडमध्ये भरणाऱ्या 98 शाळांपैकी आतापर्यंत नियोजन समितीतून 25 शाळांना बांधकामासाठी निधीची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. उर्वरित शाळांना येत्या काळात निधी देऊन सर्व शाळा पक्क्या बांधकामात रूपांतरीत केल्या जाणार आहेत. जिल्हा नियोजन निधीचा वापर कायदा व सुव्यवस्थेसाठी व्हावा, यासाठी सी.सी.टीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. बीडसह परळी, माजलगाव येथे 12 कोटी 95 लाख निधी खर्च करून 426 ठिकाणी आधुनिक पद्धतीची सीसीटीव्ही यंत्रणा उभारली आहे. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात देखील सीसीटीव्ही यंत्रणा बसविने प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या अंतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह उभारणी तसेच बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय भवन बांधकाम, अद्ययावत कृषी भवन, कृषी महाविद्यालय, जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे काम यांच्या रूपाने जमिनीवर दिसणारा विकास आकारास येत आहे. या सर्वांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सोबतीने जिल्ह्यातील इतर ऐतिहासिक किल्ले व तीर्थक्षेत्रांचा विकास याकडे सरकारचे लक्ष असून या सर्वांचा विकास करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत, असेही मंत्री श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडू व सैन्य दलातील जवान अविनाश मुकुंदराव साबळे यांच्या यशाचे कौतुक केले त्यांचा जिल्हाच नव्हे तर देशाला अभिमान आहे असे ते म्हणाले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here