राज्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चे आयोजन

0
43

मुंबई, दि.३१ : राज्यातील पशुपालकांमध्ये पंचसुत्रीच्यासंदर्भात जागृती निर्माण करणे तसेच  पंचसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संपुर्ण राज्यात दि.१ ते दि.१५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ आयोजित करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली व महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार राज्यभर राबविला जाणार आहे.

पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करुन पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याची आवश्यकता विचारात घेऊन राज्यात पशुउद्योजकता निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग विभागाकडून “उच्च उत्पादन क्षमता असलेल्या वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन” या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  पंधरवड्यादरम्यान पंचसुत्रीची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाची अंमलबजावणी  गावपातळीवर शिबीरे, कार्यशाळा,व्याख्याने,  तज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी पशुपालकांचे अनुभव कथन यासांरख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राज्यातील पशुधनाची पूर्ण उत्पादनक्षमता वापरात आणणे तसेच उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने पशुपालकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याबरोबर पशुपालन व्यवसाय फायदेशीरपणे करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे.

व्यावसायिक दृष्टीकोनातून व्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी पशुजन्य पदार्थ (उदा. मांस, लोकर, अंडी इ.) तसेच दुध व दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, खरेदी, विक्री याची माहिती पशुपालकांना करुन देणे आवश्यक आहे.  पशुपालन हा व्यवसाय केवळ शेतीपूरक अथवा जोडधंदा न राहता तो पशुपालकाचा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होईल या दृष्टीकोनातून पशुपालन उद्योजकता निर्माण करण्यासाठी  या पंचसुत्रीची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

या कालावधीत पंधरवड्याची माहिती सर्व पशुपालकांना व्हावी यासाठी व्यापक स्वरुपात  देण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, कृषि उत्पन्न बाजार समिती, आठवडी बाजार  इत्यादी ठिकाणी पशुपालकांसाठी कार्यक्रमांचे माहितीबाबत प्रसिध्दी करण्यात येईल.

 पशुसंवर्धन पंधरवड्यादरम्यान दैनंदिन कार्यक्रमांचे संयोजन व संनियंत्रण आयुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्फत करण्यात येईल, अशी माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here