एल.अँड टी. कंपनीमार्फत दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत; कुटुंबातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी मिळणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
16

पालघर, दि. 14 :- सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एम.एम.आर.डी.ए.) मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांना एल. अँड टी. कंपनीमार्फत पन्नास लाख रुपयांची मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला एल. अँड टी. कंपनीमध्ये नोकरी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए.) चे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, मिरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सूर्याप्रकल्पाचे पाणी मीरा-भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी एम.एम.आर.डी.ए. मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत जेसिबी ऑपरेटर राकेश यादव हे जेसीबीसह ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी भारतीय नौसेना (Navy), भारतीय लष्कर (Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल – (NDRF), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल- (TDRF), अग्निशमन दलाच्या तुकड्यांना बोलवण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी व्हीजेटीआयच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनही घेण्यात येत आहे.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भारतीय नौदल व भारतीय लष्करातील जवानांना बचाव कार्याचा अनुभव असतो त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून या दुर्घटनेतील व्यक्तीला बाहेर काढण्यास यश मिळेल. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एल. अँड टी. कंपनी मार्फत पन्नास लाख रुपयांची मदत आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला एल अँड टी. कंपनीत नोकरी मिळणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी राकेश यादव यांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि वडील व इतर सदस्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.बोडके यांना दिल्या.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here