शासकीय यंत्रणांच्या सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर – पालकमंत्री उदय सामंत

0
39

रायगड(जिमाका)दि.13:- रायगड जिल्हा प्रशासन गतीमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे, प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपुजन, उद्घाटन, लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे आदि उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या जिल्हा मध्यवर्ती फळरोप वाटीका वेश्वी अलिबाग येथील दगड संरक्षक भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच कुरुळ अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रात्यक्षिक गृहाच्या इमारतीचे नूतनीकरण,राज्य शासनाच्या निधीतून पनवेल येथील मागास वर्गीय मुलींचे वसतिगृहाचे भूमिपुजन या बरोबरच पोलीस विभागाच्या 15 वाहनांचे हस्तांतरण करण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले,रायगड जिल्हा पोलीस दल सक्षम करण्यासाठी मागील वर्षापासून  जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाहने उपलब्ध देण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्ययातील अलिबाग, महाड, रोहा या क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पुढच्यावर्षी माणगाव, खोपोली, पेण, उरण येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 6 कोटी 40 लाख देण्यात येत आहेत. तसेच आगामी वर्षात पोलीस दलास नव्याने 15 वाहने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यातील तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना नवीन वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत.  सर्व अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व सचोटीने करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here