‘आयुष्यमान भारत’ मोफत नोंदणी, केवायसी सुविधा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घ्यावा – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

0
28

छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका) :- केंद्राच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत यात्रा’ सुरु करण्यात आली आहे. लवकरच ही यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही सुरु होईल. यानिमित्ताने विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावयाचे आहेत. जिल्ह्यात आयुष्यमान भारत ही आरोग्य सुविधा पुरविणारी योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोफत नोंदणी, केवायसी सुविधा उपोलब्ध आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहनही केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध योजनांचा आढावा आज डॉ. कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, मनपा उपायुक्त अपर्णा थेटे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा शिक्षण अधिकारी एम.के.देशमुख, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, तहसिलदार यांच्यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अदिवासी विभाग, नगरपालिका महिला बालकल्याण मुख्यअधिकारी, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्यासह संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा

डॉ. कराड म्हणाले की,आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी (सेवा केंद्र),  येथे मोफत नोंदणी करावी. तसेच केवायसी करावयाची असल्यास ती ही मोफत करावी. त्यानंतर हे कार्ड मोफत घरपोच पोहोचवले जाईल. तरी नागरिकांनी लाभ घ्यावा. या योजनेद्वारे लोकांना आरोग्य विम्याचा लाभ मिळतो, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. त्यासाठी ग्राम पातळीपासून ते शहरी भागातही आशा स्वयंसेविका, स्वस्तधान्य दुकाने यांच्यामार्फत लोकांपर्यंत माहिती पोहोचवून अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी निर्देशित केले. कृषी, ग्रामविकास, अदिवासी विकास विभाग, शिक्षण, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने आयुष्यमान भारत योजनेच्या लाभासाठी मोफत नोंदणी करुन घेण्यात यावी. जेणेकरुन सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा विमा कवच प्राप्त होईल. तसेच ही नोंदणी करण्यासाठी आशा अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, नागरी सुविधा केंद्र याची मदत घेऊन उद्ष्टि पूर्ण करण्याचे निर्देश डॉ.कराड यांनी दिले. प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  समन्वय असणे गरजेचे आहे. योजनांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात ७ प्रचार रथ येणार आहेत.  प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत.

विविध योजनांचा आढावा

बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना,  प्रधानमंत्री जनधन योजना,  प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना,  प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना,  किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री पोषण योजना, हर घल जल योजना, स्वामित्व योजना, अशा विविध योजनांचा आढावा डॉ. कराड यांनी घेतला.

कार्यशाळा घेऊन योजनेची माहिती पोहोचविणार

किसान क्रेडीट कार्ड,  जनधन योजना, महिला बचत गटांना अर्थसहाय्य देणे यासाठी आपण योजना निहाय शेतकरी, महिला, नव उद्योजक यांची कार्यशाळा घेऊन त्यांच्या पर्यंत माहिती पोहोचवू, त्याचे नियोजन करावे,असे निर्देशही डॉ. कराड यांनी यंत्रणेला दिले.  तसेच याबाबत प्रचार प्रसिद्धी करुन विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत माहिती पोहोचवा,असे निर्देशही डॉ. कराड यांनी दिले. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात या यात्रेस प्रारंभ होईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here