कारागिरांनो… प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा घ्या लाभ

0
11

देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी गावातील बलुतेदारांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळावे, त्यांचे कौशल्य आणखी वाढावे, यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. कारागिरांच्या विकासासाठी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. देशातील बेरोजगारी कमी करणे आणि गरीब कारागिरांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. लोहार, सोनार, कुंभार, सुतार आणि मोची यांसारखी पारंपारिक कौशल्ये असलेल्या लोकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळेल. अशा 18 पारंपरिक कामांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत कारागिरांना आधुनिक साधनांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि या प्रशिक्षणादरम्यान 500 रुपये भत्ता दिला जाईल. यासोबतच, प्रशिक्षण पूर्ण केल्यावर, उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंतची मदत देखील दिली जाणार आहे.

पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे फायदे

  • आर्थिक मदत
  • जगभरातील बाजारपेठांमध्ये प्रवेश असेल
  • वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाशी संबंधित
  • नवीनतम तांत्रिक प्रगतीमध्ये प्रवेश
  • प्रगत कौशल्य प्रशिक्षण

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेसाठी पात्रता

स्वंयरोजगाराच्या आधारावर असंघटीत क्षेत्रात हात आणि साधनांनी काम करणारा आणि योजनेतील 18 व्यवसायापैकी कुटुंब आधारित पारंपारिक कारागिर नोंदणीसाठी पात्र असेल. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यालाच लाभ मिळेल. कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि अविवाहित मुले होय. लाभार्थीचे वय नोंदणीच्या तारखेला 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

जर एखाद्याला योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याला त्याच व्यवसायात काम करावे लागेल, ज्यामध्ये त्याने नोंदणीवेळी व्यवसाय करण्याची माहिती दिली होती. मागील 5 वर्षात स्वंयरोजगार तथा व्यवसाय विकासासाठी इतर योजनांतर्गत कर्ज घेतले नसावे. (उदा. केंद्र, सरकार किंवा राज्य सरकारचे पीएमईजीपी / सीएमईजीपी तथापी मुद्रा ) पीएम स्वनिधीचे लाभार्थी ज्यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे, ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत पात्र असतील. सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय या योजनेंतर्गत पात्र असणार नाहीत.

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे लाभ/ फायदे

यशस्वी नोंदणी आणि पडताळणीनंतर लाभार्थीला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जाईल. कौशल्य पडताळणीनंतर पाच दिवसीय बेसिक प्रशिक्षण व 15 दिवसीय प्रगत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत दररोज प्रत्येक प्रशिक्षणार्थीना 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट (व्यवसाय साहित्य) खरेदीसाठी 15 हजार रुपयांचे ई-व्हाऊचर दिले जाईल. मूलभूत कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र होईल. पहिल्या टप्प्यात 5 टक्के व्याजासह 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 1 लाखापर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळेल. दुसऱ्या टप्प्यात प्रगत कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या, तसेच डिजिटल व्यवहार स्वीकारलेल्या कारागिरांना 18 महिन्यांच्या परतफेडीच्या कालावधीसह 2 लाखापर्यंत तारणमुक्त कर्ज मिळेल. डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन, लाभार्थीना जास्तीत जास्त 100 व्यवहारांसाठी मासिक प्रती व्यवहार एक रुपया प्रोत्साहनपर मिळेल. मार्केटिंग सहाय्य प्रचार-प्रसिध्दी, गुणवत्ता प्रमाणीकरण, ब्रँडिंग व प्रदर्शने यासाठी त्यांना वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांचे सहकार्य लाभेल.

या कारागिरांचा योजनेत समावेश

सुतार,  होड्या बनवणारे,  हत्यारे बनवणारे,  लोहार,  टाळा बनवणारे,  हातोडा आणि टूलकिट बनविणारे, सोनार, कुंभार,  मूर्तीकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपारिक बाहुल्या आणि खेळणी बनविणारे, न्हावी, हार बनविणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 अशी करा नोंदणी

ग्रामीण भागातील सुविधा केंद्रावर (सीएससी) आपली माहिती भरून नोंदणी करावी. ही माहिती गावाचे सरपंच तपासून योग्य असलेल्या उमेदवारांची माहिती व अर्ज जिल्हा समितीकडे पाठवितात. जिल्हास्तरीय समिती या यादीतील कारागिरांना प्रशिक्षणासाठी निवड केली जाते.

 जास्तीत जास्त कारागिरांनी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी

ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील कारागिरांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन आपले कौशल्य विकसित करावे. आपले जीवनमान उंचावून कौशल्य विकसित करावे. जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विश्वकर्मा कारागीर निर्माण व्हावे, यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी सामूहिक सुविधा केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

 नंदकुमार वाघमारे

माहिती अधिकारीजिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here