पीक उत्पादकता वाढीसाठी कृषी विभागाने जबाबदारी घ्यावी  – पालकमंत्री हसन मुश्रीफ

0
11

कोल्हापूर दि.२१,(जिमाका)  : दिवसेंदिवस पीक उत्पादकतेत घट होत असून ऊसासह सर्वच पीकांचा यात कमी अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे कृषी विभाग, त्यातील तज्ज्ञांनी उत्पादकता वाढीची जबाबदारी घेण्याच्या सूचना कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या. वनामती नागपूरच्या अधिनस्त प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अर्थात रामेती या संस्थेच्या प्रशिक्षणार्थी वसतीगृह इमारतीच्या उद्घाटनानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

कसबा बावडा येथील वसतीगृहाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यानंतर शेतकरी मेळावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, प्राचार्य उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, शेतकरी, निविष्ठाधारक, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, हल्ली ऊस उत्पादनात एकरी उत्पन्न कमी होत आहे, कारखाने 5-6 महिनेच चालतात, कारखानदारांना काम न करताच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे लागते. या वर्षी सर्वात कमी गाळप हंगाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात, इतर पिकांमधे मार्गदर्शन करून कृषी विभागने उप्त्पादन वाढीसाठी ठोस काम करावे, असे ते म्हणाले.

बोगस बियाणे, खते व किटकनाशके यांना आळा घालण्यासाठी शासन कायदा करत असल्याचे सांगितले. बोगस बियाणांची पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया जातो. शेतकरी हाच आपला वाली आहे, तो राजा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण चांगले कार्य करणे गरजेचे आहे. कृषी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी स्वत:च्या शेतात चांगली शेती करून इतर शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडा पार्क येथे शासनाने कृषी विभागास कृषी भवन बांधण्यासाठी जागा दिली आहे. यासाठी पुढिल प्रक्रिया राबविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

उद्घाटन केलेल्या रामेतीच्या नवीन वसतीगृहात 80 प्रशिक्षणार्थींच्या व्यवस्थेसाठी 40 खोल्या, 2 व्हीआयपी सूट, डॉरमेटरी, डायनींग, किचन व लायब्ररीची व्यवस्था केली गेली असल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिली.

आमदारी सतेज पाटील यांनी कृषी विभाग, आत्माच्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांसाठी चांगले प्रयोग राबविण्यात येत असल्याचे सांगितले. रामेतीला आता प्रशस्त अशी प्रशिक्षणार्थी निवास व्यवस्था झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांसाठी आता कृषी भवनाची गरज असल्याचेही ते म्हणाले. रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रविण बनसोडे यांनी सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि बदलते कृषी तंत्रज्ञान या पुस्तकांचे विमोचन पालकमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गुणवत्ता प्रमाणपत्र वितरण – पालकमंत्री श्री. मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम बॅच 3 व 4 मधील स्वप्निल पिरकाने, सुनिल जाधव, सोमनाथ पुजारी, प्रकाश साळोखे, विनोद ननवरे आणि दत्तात्रय पवार यांना गुणवत्ता प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट को-ऑप. बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल कृषी अधिकारी अतुल जाधव यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here